Ashok Saraf: गेली अनेक वर्षे मराठीतील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ मनोरंजनसृष्टीत काम करत आहेत. मराठी सोबतच त्यांनी हिंदी चित्रपटात सुद्धा आपल्या उत्तम अभिनयानाने आणि विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे.
अशोक सराफ यांनी नुकतीच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड मधील बरेच अनुभव त्यांनी मिडिया समोर शेअर केले. दरम्यान मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये नोकराचीच भूमिका का दिली जाते ? यावर बोलताना अशोक सराफ यांनी आपले स्पष्ट मत मांडल आहे. चला तर मग जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून.
बॉलीवूड मराठी कलाकारांना डावलतं का ?
“मराठी माणसाने हिंदी सिनेमात, नोकर आणि गडी असलेच छोटे रोल केले. त्याचे कारण हिंदी सिनेमातील हिरोची ठरलेली प्रतिमा असायची. सहा फूट उंचीचा, गोरापान आणि विशिष्ट लुक असणारा हिरो. आणि त्या कॅटेगिरी मध्ये मराठी कलाकार बसत नाहीत, म्हणून मोठे रोल मिळत नाहीत. हिंदी भाषेचा मुद्दा उगाच उपस्थित केला जातो. बंगाली, गुजराती कलाकार हिंदी बोलताना त्यांचा लहेजा येतो, पण त्यांना कमी लेखलं जात नाही. मात्र, मराठी कलाकारांकरिता हेच नियम वेगळे का?” असा प्रश्न अशोक सराफ यांनी उपस्थित केला.
बॉलिवूडमध्ये सन्मान मिळाला, पण मोठ्या भूमिका नाही…
हिंदी सिनेसृष्टीने त्यांच्या कामाचा, अभिनयाचा योग्य आदर केला. परंतु त्यांना कधीही मुख्य प्रवाहात येऊ दिलं नाही, असंही अशोक सराफ म्हणाले. “हिंदी सिनेमांमध्ये मला नेहमीच सन्मान मिळाला, पण कधीही मोठ्या भूमिका मिळाल्या नाहीत. माझे काम त्यांना आवडायचं, पण त्यांनी मला पुन्हा रिपीट केलं नाही.
मराठी कलाकारांना मोठ्या संधी मिळतील ?
सध्या बरेच मराठी कलाकार बॉलिवूडमध्ये चांगल काम करताना दिसत आहेत. परंतु अजूनही त्यांना हक्काची ओळख मिळेल का, हा प्रश्न कायम आहे. अशोक सराफ यांचे अनुभव हेच दर्शवतात की, मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये संधी मिळण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागतो.
बॉलिवूड कलाकारांसोबतचे अनुभव
सलमान खान माझ्याशी छान वागत असे, जरी तो फारसा बोलका नसला तरी. “शाहरुख खान फार मेहनती आणि डाऊन टू अर्थ आहे. मी त्याच्यासोबत 4 सिनेमे केले आहेत. मी काहीतरी सूचवलं की, तो लगेच म्हणायचा, ‘चला, पुन्हा सराव करूया.’ अजय देवगण फारसा बोलत नाही, पण तो ही आपल्या कामाशी प्रामाणिक आहे.