Samay Raina : महाराष्ट्र सायबर सेल कडून, समय रैनाच्या प्रसिद्ध शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या शेवटच्या भागात आई-वडिलांबद्दल केलेल्या घाणेरड्या विनोदांच्या प्रकरणात युट्यूबरविरुद्ध तिसरे समन्स जारी केले आहे. सायबर सेलने त्याला २४ मार्चपर्यंत कोणत्याही परिस्थितीत हजर राहण्यास सांगितले आहे.

समय रैनाच्या युट्यूब वरील प्रसिद्ध शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. कायदेशीर अडचणी मध्ये अडकल्यानंतर, समय रैनाला महाराष्ट्र सायबर सेलकडून सतत समन्स पाठवले जात आहेत.
‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या शेवटच्या भागाच्या रिलीजनंतर, रणवीर अल्लाहबादिया, अपूर्व मुखिजा, आशिष चंचलानी,जसप्रीत सिंग यांच्यासह समय रैना यांच्याविरुद्ध अश्लील विनोद केल्याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ मध्ये रणवीर अलाहबादिया याने पालकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या होत्या. त्यानंतर लोकांनी शोमध्येच प्रश्न उपस्थित केले होते. पुढे वाद वाढत गेल्यानंतर, समय रैनाने आपल्या यूट्यूब चॅनलवरून शो चे सर्व एपिसोड डिलिट करून टाकले.
महाराष्ट्र सायबर सेलने समय रैनाविरुद्ध तिसरे समन्स जारी करीत, त्याला सलग तिसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. सायबर सेलने समय रैनाला २४ मार्चपर्यंत हजर राहण्यास सांगितले आहे. समय रैनानेही १९ मार्चचे समन्स चुकवले होते. जर रैना यावेळी हजर राहिला नाही तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येऊ शकते, अशी शक्यता आहे.
महाराष्ट्र आणि आसाममध्ये रणवीर अलाहाबादिया आणि इतर पॅनेल सदस्यांसह शो मध्ये घाणेरडे विनोद केल्यामुळे एफआयआर दाखल करण्यात आले होते. समय रैना यांनी अमेरिकेतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचे म्हणणे नोंदवण्याची विनंती केली होती परंतु ती नाकारण्यात आली होती. या घटनेनंतर रणवीर आणि शो मध्ये उपस्थित इतर पाहुण्यांनी सुद्धा लोकांची माफी मागितली.