मारुती सुझुकी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय असलेली मोठी कार निर्मिती कंपनी म्हणून ओळखले जाते. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी दरवेळी नवनवीन वरिएंट बाजारात आणण्याचा प्रयत्न करीत असते. यावेळी सुद्धा मारुती सुझुकीने आपल्या ग्राहकांसाठी तीन नवीन हायब्रिड कार बाजारात आणण्याची तयारी केली आहे. तसेच या कार सर्वोत्कृष्ट इंधन कार्यक्षमता तसेच पर्यावरण पूरक असणाऱ्या तंत्रज्ञानासह बाजारात पदार्पण करणार आहेत. या नवीन गाड्यांचे मायलेज प्रति लिटर 35 किलोमीटरच्या पुढे जाऊ शकते, असे सांगण्यात आले असून, ज्या ग्राहकांना पूर्णपणे इलेक्ट्रिक कार घेणे परवडत नाही अथवा बऱ्याचदा चार्जिंग सुविधेची समस्या येत असते. अशा अनेक समस्या लक्षात घेऊन कंपनीने हायब्रिड तंत्रज्ञानाचा वापर करून एक चांगला पर्याय शोधून काढला आहे. चाचणी दरम्यान मारुती सुझुकीची ही नवीन मॉडेल्स दिसली असून, येणाऱ्या काळात भारतीय बाजारपेठेत दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मारुती सुझुकी फ्रॉन्क्स हायब्रिड
मारुती सुझुकीच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही Fronx च्या हायब्रिड व्हर्जनसाठी ग्राहकांमध्ये आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हायब्रिड तंत्रज्ञानामुळे ही कार अधिक मायलेजसह अधिक इंधन-कार्यक्षम असणार आहे. उपलब्ध अहवालांनुसार, Fronx Hybrid एक लिटरमध्ये 35 किलोमीटर पर्यंत मायलेज देऊ शकते. यासोबतच 1.5-2 kWh बॅटरी पॅक बसवण्यात येईल तसेच ही कार मे-जून 2025 मध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे.
मारुती बलेनो हायब्रिड
मारुती सुझुकी आपल्या लोकप्रिय हॅचबॅक बलेनोचे हायब्रिड व्हर्जन लवकरच बाजारात घेऊन येणार आहे. तसेच या कारमध्ये 1.2L Z12E पेट्रोल इंजिनसह 1.5-2 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक बसवण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान इंधनाच्या वापरास कमी करून उच्च मायलेज देण्याच्या क्षमतेत मदत करणार आहे. Baleno Hybrid एक लिटर पेट्रोलमध्ये साधारणपणे 35 किलोमीटर पर्यंत मायलेज देण्यास सक्षम ठरेल. ही कार 2025 च्या अखेरीस बाजारात येऊ शकते अशी शक्यता आहे. आणि तिची किंमत 10 लाख रुपयांच्या आत असू शकते.
मारुती न्यू कॉम्पॅक्ट एमपीव्ही
मारुती सुझुकी नवीन कॉम्पॅक्ट एमपीव्ही Spacia देखील बाजारात आणण्याचा तयारीत आहे. तसे पाहिले तर हे मॉडेल आधीच जपानमध्ये विकले जाते आहे. आणि आता भारतीय बाजारपेठेसाठी त्याचे हायब्रिड व्हर्जन आणले जाणार असल्याची तयारी सुरू आहे. या कारला फक्त हायब्रिड इंजिन देण्यात येणार असून, अद्याप या वाहनाच्या इंजिन स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.
हायब्रिड तंत्रज्ञानाचे फायदे
प्रदूषण कमी – हायब्रिड वाहनांमध्ये कमी उत्सर्जन होते, त्यामुळे अशा कार पर्यावरणपूरक पर्याय ठरतात.
इंधनाचा खर्च कमी – कमी इंधन वापरामुळे इंधनाच्या खर्चात बचत होऊ शकते.
उच्च क्षमता असलेले मायलेज – पारंपरिक पेट्रोल इंजिनच्या तुलनेत हायब्रिड तंत्रज्ञानामुळे इंधन कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत स्वस्त – इलेक्ट्रिक कारपेक्षा हायब्रिड वाहनांची किंमत तुलनेने कमी असते. आणि त्यांची चार्जिंग सुविधा देखील सहज उपलब्ध असते.