सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याचे योग्य ती काळजी घेणे अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे. परंतु ही बाब बरेच जण लक्षात घेत नाहीत, आणि पुन्हा अनेक प्रकारच्या आजारांशी त्यांना झगडावे लागते. असंतुलित पणाचा आहार, जंक फूडचे प्रमाण यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग आणि पचनासंबंधीच्या समस्या आ वासून उभ्या राहतात. त्यामुळेच योग्य वेळी, आपल्या शरीराला आवश्यक पोषणतत्त्वे मिळण्यासाठी नैसर्गिक आहाराचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे असते.
सध्या सुपरफूड्स मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होताना दिसत आहेत, त्याचे कारण असे की, ते आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या आवश्यक असलेले पोषक घटक पुरविण्याचे काम करतात.
भोपळ्याच्या बियांचा समावेश देखील अशाच एका सुपर फुड्स मध्ये होतो. भोपळ्याच्या बिया दिसायला जरी लहान असल्या तरी त्या पोषणतत्त्वांनी समृद्ध आहेत. आणि शरीरासाठी तर अतिशय फायदेशीर.
बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम :
भोपळ्याच्या बियामध्ये योग्य प्रमाणात फायबरचा सामावेश असतो.जे आपल्या पचनसंस्थेसाठी अतिशय फायदेशीर ठरते. आणि हे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यास मदत करते. आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करण्याचे काम करते.
पचन संस्था सुधारण्यासाठी फायदेशीर:
पाण्यात भिजवलेल्या भोपळ्याच्या बिया दररोज सकाळी खाल्ल्याने पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते आणि शरीर अधिक हलके व ताजेतवाने वाटते.
वजन कमी करण्यासाठी :
आजच्या जीवनशैलीतील मोठा प्रश्न बनला आहे, तो म्हणजे लठ्ठपणा. आणि यासाठी अनेक जण तरी चे उपाय करतात परंतु, जर तुम्ही नैसर्गिकरित्या वजन कमी करू इच्छित असाल, तर भोपळ्याच्या बियांचा आपल्या आहारात नक्कीच समावेश करून बघावा. यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आणि प्रथिने असते, जे भूक कमी करण्यास मदत करतात.
चांगल्या झोपेसाठी फायदेशीर :
भोपळ्यांच्या बियांचे नियमितपणे सेवन केल्यास, झोपेच्या समस्यांवर देखील याचा चांगला परिणाम दिसून येतो. यामध्ये असलेले ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो आम्ल नैसर्गिकरित्या झोपेच्या चक्राला सुधारण्यास मदत करते आणि चांगली झोप लागण्यास मदत करते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत :
रोगप्रतिकारक शक्ती बळकट असल्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. . भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात झिंक तसेच अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे, ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात आणि संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण देखील करतात.