आज सर्वत्र होळीचा सण अगदी आनंदाने साजरा होत आहे. एकमेकांना रंग लावून हा सण उत्साहात साजरा केला जातो. होळी खेळून झाल्यानंतर, चेहरा, हात आणि शरीरावरील लागलेला रंग काढणे हे एक प्रकारचे आव्हानच असते. होळी खेळून झाल्यावर,साबण आणि पाण्याने तासनतास घासून सुद्धा रंग पूर्णपणे निघत नाही. आणि त्वचा सुद्धा कोरडी आणि निर्जीव होते. जर तुम्हाला सुद्धा शरीराला लागलेले रंग काढण्यासाठी जास्त प्रयत्न न करता होळीचे रंग कायमचे काढायचे असतील तर, आजच्या या लेखातून आम्ही तुम्हाला असे काही, सोपे आणि घरगुती उपाय सांगणार आहोत, जे नक्कीच तुम्हाला रंग काढण्यासाठी मदत करतील.
नारळाचे तेल :

होळी खेळल्यानंतर प्रथम त्वचेवर नारळ किंवा मोहरीचे तेल लावून, हलक्या हातांनी मालिश करून त्यानंतर, कोमट पाण्याने आणि सौम्य फेसवॉशने धुतल्याने त्वचेवर कोणतीही जळजळ होत नाही.
बेसन आणि दह्याचा स्क्रब :

बेसन आणि दह्याची पेस्ट करुन चेहऱ्यावर स्क्रब केल्याने तुमची त्वचा मऊ करण्यासाठी मदत होते. ही पेस्ट कशी करायची तर , यासाठी बेसन आणि दही मिसळून जाड पेस्ट तयार करावी, आणि रंग लागलेल्या भागांवर लावावी. ही पेस्ट चेहऱ्यावर सुकल्यानंतर, ती हलक्या हाताने घासून काढावी. यामुळे रंग तर निघून जाईलच शिवाय, त्वचा देखील चमकदार आणि मऊ होण्यास मदत होईल.
कोरफड – गुलाबजल मिश्रण :

ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी आपल्या चेहऱ्यावरील रंग काढण्याकरिता साबण अथवा इतर रसायनांचा वापरू नका. तर त्याऐवजी, कोरफडीचे जेल आणि गुलाबपाणी यांचे मिश्रण करून, हलक्या हातांनी मालिश करावी. यामुळे चेहऱ्यावरील रंग निघून जाण्यास आणि त्वचा मऊ होण्यास मदत होते.
लिंबू आणि मध :

जर लिंबू तुमच्या त्वचेला सूट होत असेल तर, तो घेऊन त्या रसात मध मिसळा आणि रंग लागलेल्या भागांवर लावा आणि १० मिनिटांनी धुवावे. यामुळे त्वचेवर चिकटलेला रंग सहज निघतो.